नक्षत्रप्रकाश वासंतीक विशेषांक - शके १९३९ हेमलंबीनाम संवत्सर





नितीन जोगळेकर
सल्लागार - मनुष्यबळ आणि प्रशिक्षण तसेच करीयर कॉन्सेलींग आणि ज्योतिष
पत्ता: सज्जन प्लाझा बेसमेंट, चापेकर चौकाजवळ, हिंदुस्थान बेकरीसमोर
चिंचवड पुणे - ४११०३३
फ़ोन : अपाईंटमेंटकरीता - 9763922176


माझी माहिती

नितीन जोगळेकर मी गेले ५२ वर्षे चिंचवड पुणे  निवासी आहे. वयाच्या १८ वर्षी डिप्लोमा इन इलेट्रीकल संपादन करुन बजाज अ‍ॅटो लिमीटेड या कारखान्यात इंजिनीयर म्हणुन नोकरीला सुरवात केली. बजाज मधे असताना १९८८  साली कै. श्रीकांत जोगळेकर ( माझे काका ) यांच्या मार्गदर्शनाने योग विद्या धाम पिंपरी चिंचवड ची स्थापना करण्यात सहभाग तसेच पिंपरी चिंचवडच्या योग शिक्षकांच्या पहिल्या बॅच मधे सहभाग होता. १९९२ साला पर्यंत विवीध सामाजीक, धार्मीक संघटना स्तरावर सहभाग घेतला. १९९२ साली चिंचवडला डॉ. धुंडीराज पाठक यांच्या शंकर ज्योतिष विद्यालयात ज्योतिषाचे धडे घेऊन सुरवातीला ज्योतिष विशारद व पुढे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची ज्योतिषशास्त्री ही पदवी संपादन केली. त्याच बरोबर वास्तुशास्त्र विशारद ही सुध्दा पदवी संपादन केली. १९९८ साली ज्योतिष सल्लागार म्हणुन कामाला सुरवात केली. काही व्यावसायीक अडचणींमुळे त्यांना काही काळ सल्लागार काम म्हणुन काम पहाता आले नाही कारण याच काळात त्यांची बजाज अ‍ॅटो लिमीटेड येथेच एच आर व ट्रेनिंग मॅनेजर पदावर नियुक्ती झाली होती.

दरम्यानच्या काळात त्यांनी अर्थशास्त्र घेऊन बी.ए. व पोस्ट ग्रॅज्युएशन इन ह्युमन रिसोर्सेस डेव्हल्पमेंट या विषयातल्या पदव्या संपादन केल्या व २००७ ते २०१३ पर्यंत एच आर हेड पदावर अन्य कंपन्यात काम केले. २०१३ साली ह्युमन रिसोर्सेस सल्लागार म्हणुन काम सुरु करुन सध्या स्वतंत्र व्यवसाय सुरु आहे. मनुष्यबळ पुरवठा व ट्रेनिंग तसेच उत्पादकता, गुणवत्ता आणि अन्य मॅनेजमेंट विषयावर अनेक कंपन्यांना व व्यावसायीकांना मार्गदर्शन करतो आहे. ट्रेनर म्हणुन काम करण्याची आवड आहे आणि तो सुध्दा व्यवसाय आहे. नजिकच्या काळात आणखी एक क्षेत्रात काम सुरु केले आहे ते म्हणजे करियर समुपदेशन ( कॉन्सेलींग ).

२०१४ पुर्ण वेळ व्यवसायीक म्हणुन कामाला सुरवात केल्यावर वेदमुर्ती करंबळेकरगुरुजी यांच्या आग्रहाने पुन्हा ज्योतिषसल्लागार म्हणुन कामाला सुरवात केली. सप्टेंबर २०१६ पासुन हे सल्ला केंद्र सज्जन प्लाझा बेसमेंट, चापेकर चौकाच्या जवळ, हिंदुस्थान बेकरी समोर पुन्हा सुरु केले आहे. केवळ सल्ला देणे हा भाग यात नसुन काही मुलभूत संशोधन व्हावे हा ही मानस आहे.

ज्योतिषसल्ला तसेच करीयर गायडन्स साठी फ़ोनवर भेटीची वेळ ठरवुन भेट घेता येईल या साठी नंबर - 9763922176


संपादकीय

शके १९३८  मधे आलेल्या २०१६ च्या दिवाळी निमीत्त आपण नक्षत्र प्रकाश हा दिवाळी अंक प्रकाशीत केला.  ज्योतिष प्रेमी लोकांपर्यंत ज्योतिषविषयक संकल्पना व त्याबाबतची विवीध मते पोचवण्याचा तो प्रयत्न आहे. यात ज्योतिषप्रेमींना खर्च करुन तो अंक विकत घेण्याऐवजी अत्यंत अल्प खर्चात घरपोच कसा पोचवता येईल या दृष्टीने मला ब्लॉगवर लेखन करुन त्याची लिंक लोकांपर्यत पोचवणे हा मार्ग अत्यंत स्वस्त, हा उपक्रम कमीत कमी वेळात खात्रीने पुर्ण होईल अशी शक्यता असणारा तसेच तो दिर्घ काळा वाचनात उपलब्ध राहील असा आहे. याच बरोबर पर्यावरणाची काळजी घेऊन पेपर लेस होत आहे.

याचीच पुढची पायरी म्हणजे वासंतीक अंक आपल्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. नविन शक संवत्सराचे स्वागत आणि हिंदु कालगणनेचे स्मरण रहावे तसेच  चैत्री पाडवा ह्या दिवशी नविन वर्षाच्या पंचांगाच्या पुजनाने आणि वर्षफ़ल ऐकुन नविन वर्षाची सुरवात व्हावी या परंपरेचे जतन व्हावे हा आहे.

परंपरांचे स्मरण आणि जतन हा संस्कृती जतनाचा उत्तम मार्ग आहे. पाश्चात्य संस्कृतीचे छुपे आक्रमण कायम होतच असते. मग ते हिंदु षोडश संस्काराचे महत्व कमी होऊन होत आहे तसेच ते पाश्चात्य संकल्पना दैनंदिन जीवनात संक्रमीत होऊन ही होत आहे. सर्वच पाश्चात्य संकल्पना फ़ोल आहेत असे म्हणणे कालानुरुप तर नाहीच पण त्याचा तौलनीक अभ्यास न करता बोलणे म्हणजे केवळ आपल्या परंपरांचा दुराग्रह धरणे असे होईल.

१४ फ़ेब्रुवारीला मी पहात होतो ते व्हॅलेंटाईनचे फ़ॅड. अगदी लग्न होऊन २५ वर्षे झालेले पती-पत्नी त्यांचे जुने फ़ोटो व्हॅलेंटाईनला मित्रांसमोर आणण्यात धन्यता मानत होते. कोणत्याही संस्कृतीत नातेसंबंध जन्माने निर्माण होतात. पण लग्नासारख्या  संस्काराने निर्माण झालेल्या या नात्याला प्रदर्शनीय करण्यात काय उद्दात पणा आहे ? यापेक्षा आपण एकमेकांना खरच प्रेमभावनेने जपतो का ? कितीवेळा एकमेकांना गरज असताना आपण जपणे विसरलो ? ती चुक पुन्हा कठीण प्रसंगी जपुन  सुधारता येईल का याचे दोघांनी केलेले आत्मपरिक्षण मला वाटते व्हॅलेंटाईन च्या भेटवस्तु देण्याचा प्रसंगाने भरुन निघेल असे वाटत नाही.

व्हॅलेंटाईन यांना संत म्हणुन संबोधले गेले असे म्हणतात. त्याचा पर्दाफ़ाश करताना काही जणांनी कायमच बाहेरख्याली प्रवृतीने भेटवस्तु देऊन स्त्रीयांना आकृष्ट करुन घेण्याचा मतलबी वृत्तीचे उद्दातीकरण असे म्हणले आहे. ही परंपरा म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांना आपल्या निसर्गाने निर्माण होणार्या भावना प्रकटीकरणाचे लायसन्स वाटते. त्यामुळे शिक्षणाच्या महत्वाच्या कालखंडात ध्येयापासुन विचलीत होण्यास एक कारण निर्माण होते. महानुभाव श्री नागराज मंजुळे यांनी तर प्रेमभावना निर्माण झालीच तर प्रकट का करु नये असे म्हणुन त्याचे उद्दातीकरणाला एक माईल स्टोन मिळवुन दिला. शिक्षण पुर्ण होण्यापुर्वी असे काही केल्याने, समाजाची मान्यता न मिळाल्याने करावा लागलेला संघर्ष प्रत्येक मुलांनी करावा का ? स्वत: श्री नागराज मंजुळे हा संघर्ष करावा लागु नये असेच म्हणतील.

आज त्या फ़सव्या ( infatuation ) भावनेचे प्रगटीकरण व्हायलाच पाहिजे का ? मला आवश्यक नाही असे वाटते. किमान त्याला व्हॅलेंटाईन डे सारखा प्लॅटफ़ॉर्म मिळु नये. यातुनही काही तरुण पुढे येतील. आपले करीयर जपत आपल्या भावनाही प्रगट करतील. दोन्हीचा बॅलन्स साधता आला तर आनंदच आहे. पण आपण तरुण झालो म्हणजे आपल्याला जोडीदार कॉलेजमधे असताना हवाच ही भावना विक्री करण्याचे काम चित्रपट करतो असे मला वाटते. कुमार अवस्थेतले तरुण तरुणी बॉय फ़्रेंड - गर्ल फ़्रेंड असे नाते न निर्माण झाल्यास काहीतरी चुकले असे वाटुन वैफ़ल्यग्रस्त होतात हे तर आणखी भयावह आहे.

शिवसेना व्हॅलेंटाईन डे च्या जाहीर आणि शाळा- कॉलेजातल्या , रस्त्यावरच्या प्रकटीकरणाला काही काळ विरोध करत होती. याला संस्कृती रक्षकांचे कायदाविरोधी कार्येक्रम असे संबोधुन समाजातले काही विद्वान विरोध प्रकट करत होते.  मार्ग चुकत असेल पण उद्देश्य वाईट नक्कीच नव्हता. शाळा कॉलेजातुन प्रचार करुन जसा फ़टाके उडवण्यावर मुलांचे मत परिवर्तन करण्यात आले याच प्रमाणे काही दर वर्षी या मुलांना त्यांच्या ध्येयापासुन विचलीत करणार्या प्रथांना विरोध करणारे समुपवेशन ( Counselling ) हा उपाय दिर्घकालीन शैक्षणिक धोरण म्हणुन राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने अनेक वर्षे राबवल्यास हे पाश्चात्य आणि हीन संस्कृतीचे आक्रमण आपण थोपवु शकु.

जो रोग सहजपणे जिथे उत्पन्न होतो तिथेच त्याचे औषध ही असते. या साठी अजुन चर्चा व्हावी. साधक बाधक चर्चेतुन दिर्घकालीन शैक्षणीक धोरण बनावे व अनंत काळ ते राबवले जावे यासाठी जनमताचा रेटा तयार व्हावा.




अनुक्रमणीका
०१ - संपादकीय
०२ - प्रभु रामचंद्राची जन्मकुंडली
०३ - राहू महादशा शाप की वरदान ?
०४ - हर्षल एक ताकदवान ग्रह
०५ - वास्तु दोष खरच आहे का ?
०६- नावात काय आहे ?
०७- भीम रुपी महान स्त्रोत्र
०८- एक नाड एक संशोधन प्रकल्प
०९ - नवग्रह पीडाहर स्त्रोत्र एक प्रभावी स्त्रोत्र
१० - निसर्ग आणि संपन्नता

प्रभु रामचंद्राची जन्मकुंडली

ज्योतिष हे शास्त्र आहे का असा प्रश्न अनेक वेळा विचारला गेला आहे. एखाद्या शास्त्राची चिकित्सा करण्यासाठी हा प्रश्न विचारला गेला तर तो रास्त आहे. पण जेव्हा हा प्रश्न आपल्या विचारसरणीचे महत्व वाढविण्यासाठी विचारला जातो तेव्हा ज्योतिष शास्त्र आहे हे पटवुन देण्याची आवश्यकता नक्की आहे. नुकत्याच महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. ज्या दिवशी मतदान झाले त्याच दिवशी अनेक वेळा प्रयोग करुन विकसीत झालेल्या Exit Poll चा मुंबई शहरात वापर करुन कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर अनुमान काढण्यात आले. मुख्य म्हणजे हे अनुमान बरोबर आले. लाखो मतदार जेव्हा मतदान करुन बाहेर येतात अश्यावेळी तुम्ही कुणाला मत दिले असा प्रश्न विचारला तर त्याचे ती व्यक्ती उत्तर खरे देईल या मानसिकतेवर आधारीत समाजातील विवीध वर्गाच्या ( स्त्री, पुरुष, सुशिक्षीत, अशिक्षीत, नोकरदार, व्यावसायीक, अल्पसंख्य, बहुसंख्य, विवीध भाषीक इ ) सॅपल्स आणि संख्याशास्त्रीय पध्दतीला आधार मानून ही मते रेकॉर्ड केली जातात. याचेवरुन अनुमान केले जाते. यातही Probability अर्थात शक्यता गृहीत धरली जाते. बिहार विधानसभा निवडणुकात ही भाकीते चुकलेली होती हे ही लक्षात घ्यावे. हे संख्याशास्त्रीय अंदाज असतात आणि हा प्रयोग असतो. त्यांना चुकण्याची अनुमती आहे तशीच ज्योतिषी सुध्दा चुकू शकतो.   ज्योतिषी नेमके हेच करत असतो. संख्याशास्त्रीय नियमाने सिध्द झालेल्या नियमानुसार अंदाज देत असतो. पण समाजातला एक वर्ग याला प्रयोग न मानता अंधश्रध्दा मानुन ह्या शास्त्राला बदनाम करण्यासाठी प्रयत्नशील आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

मधल्या काळात गणित न येणारे, वाचन कमी असणारे पोटार्थी लोक ह्या व्यवसायात आले आणि बिनदिक्कत खोटे ठोकुन त्यांनी ज्योतिषाची हानी केली हे ही मान्य करावे लागेल. पण ही मानवी प्रवृती आहे. मधल्या काळात सत्य मेव जयते या कार्येक्रमात अनेक डॉक्टर्स कमीशन घेतात, नको असताना टेस्ट करवतात व ऑपरेशन्स सुध्दा करतात हे जाहीर रित्या प्रसिध्द झाले आहे. याचा अर्थ सर्वच डॉक्टर्स सर्वकाळ असे वागतात असे नाही. मग सर्वच ज्योतिषी असे असतात असे गृहीत धरुन बंदी घालण्याची भाषा सुध्दा गैर आहे.

ज्योतिष हे शास्त्र आहे का असा प्रश्न विचारल्यावर याला काही इतिहास आहे का ? कुणी याचा पुर्वी अभ्यास केला आहे का ? सर्वात जुने संदर्भ काही आहेत का ? असे प्रश्न विचारले म्हणजे असे लक्षात येते के शास्त्र शुध्द आहे ते टिकुन रहाते. जे शास्त्राला धरुन नाही त्याचा अनुभव येत नाही ते मागे पडते. ज्योतिष शास्त्राचा सर्वात जुना संदर्भ म्हणजे प्रभु श्रीरामचंद्राची वाल्मिकी रामायणात वर्णन केलेली जन्म कुंडली. कुंडलीचा अभ्यास फ़क्त रामाचे आयुष्य कसे होते हे शोधण्यासाठी नाही तर नेमका तो काळ कोणता होता हे जाणण्यासाठी एका पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीने करुन सर्वप्रथम रामायणाचा काळ शोधला. इतकेच नाही तर प्रभु रामचंद्राची जन्मतारीख सुध्दा गणिताने शोधली ज्याला आता मान्यता मिळत आहे.

हा काळ इसवीसन पुर्व सुमारे ७००० वर्षांचा आहे. प्रभु रामचंद्रांच्या पत्रिकेत दशमस्थानी मेषेचा रवि आहे तो ही उच्च म्हणजे मेष नवमांशातला. हा एक उच्च राजयोग आहे म्हणुन मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा रामराज्य या संकल्पना रामाच्या नावाने आजही टिकुन आहेत.  प्रभु श्री रामचंद्राच्या पत्रिकेत लग्नी कर्क रास असुन कर्क राशीत गुरु जो उच्च असतो तसेच चंद्राची ही स्वत:ची रास आहे. कर्क राशीत गुरु आणि चंद्र हा गजकेसर योग अनेक अद्वितीय व्यक्तींच्या कुंडलीत असतो. त्याच बरोबर तुळेचा शनि चतुर्थात, मकरेचा मंगळ सप्तमात आणि मीनेचा शुक्र भाग्य स्थानात असे पाच उच्चीचे ग्रह असलेली दुसरी पत्रिका मिळणार नाही. पाच ग्रह उच्चीचे असल्याने हे पाच राजयोग प्रभु श्रीरामाच्या कुंडलीत येतात त्यामुळे आज ९ हजार वर्षांनी प्रभुश्रीराम आदर्श पुरुष तसेच आदर्श राजा आणि अनेक संतांची इष्ट देवता या स्वरुपात आजही पुजनीय आहेत.

प्रभु श्रीरामचंद्रांची ही पत्रिका साईलीला ऐप्रील १९७७ च्या अंकात होरालंकार शं. वा. देवधर यांच्या लेखात प्रथम प्रसिध्द झाली. पुण्याचे डॉ. प. वि. वर्तक यांनी यावर आणखी संशोधन करुन पाच उच्चीचे ग्रह कधी वाल्मिकी ऋषी म्हणतात त्या प्रमाणे होते ती तारीख शोधून काढली. अर्थातच हा आपल्या हिंदु कालगणने नुसार दिवस चैत्र मासातला नवमीचा होता हे सांगणे नको.



यावरुन खालील गोष्टी सिध्द होतात.

१. प्रभु श्रीराम ही पौराणीक कल्पना नसुन हा लोकोत्तर राजा इसवीसन ७ हजार वर्षे पुर्व म्हणजे साधारण ९ हजार वर्षांपुर्वी अयोध्येत राज्य करत होता.
२. जेव्हा व्यक्तीच्या कुंडलीत एक ग्रह उच्चीचा असतो त्या राजयोगाच्या जोरावर व्यक्ती आपले भाग्य काढते. प्रभु रामचंद्रांच्या पत्रिकेत पाच उच्चीचे ग्रह आहेत म्हणुन प्रभु रामचंद्रांचे नाव अद्याप घेतले जाते ह्या वरुन ज्योतिष शास्त्राचा अभ्यास वा नियम त्या ही पेक्षा रामजन्माच्या आधीचे आहेत.
३. एखाद्या व्यक्तीची नुसती पत्रिका असेल तर त्यावरुन आजच्या जगाला मान्य असलेली तारीख शोधता येते.
४. जन्मपत्रिका हे व्यक्तीच्या अस्तित्वाचे महत्वाचे कागदपत्र आहे.


नक्षत्रप्रकाश अंक वाचकांच्या हातात चैत्र महिन्यात देताना प्रभु रामचंद्रांच्या स्मरणाशिवाय आणि त्यासोबत ज्योतिष विषयाचा उहापोह करणे औचीत्यपुर्ण आहे.

 राहू महादशा शाप की वरदान ?

प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेत राहू हा ग्रह असतोच. यावाक्यावर ज्योतिष विरोधक लगेच सरसाऊन म्हणतील की राहू हा तर काल्पनिक बिंदु आहे. प्रत्यक्षात तो ग्रह नाहीच. हा वाद फ़ार जुना झाला. पुरातन ग्रंथांनी सुध्दा राहूला मान्यता दिलेली आहे ती आकाशात राहू दिसतो म्हणुन नाही तर त्याचा परिणाम दिसतो म्हणुन. राहू आणि केतु मंगळ, शुक्र किंवा गुरू सारखे आकारमान असलेले, आकाशात दिसणारे ग्रह नसले तरी प्रत्यक्षात ते नक्षत्राकडुन येणारे फ़ळ ग्रहण करतात आणि पुढे पोचवतात म्हणुन त्यांना ग्रह्ण करणारे ग्रह ह्या व्याख्येने ज्योतिषशास्त्रात ग्रह म्हणले आहे. राहू प्रत्यक्ष ग्रह म्हणुन दिसत नसला तरी ज्या ग्रहाच्या युतीत म्हणजे एकाच राशीत ५ अंश अंतरावर असल्यास जे परिणाम दिसतात त्यावरुन राहू हा पापग्रह आहे आणि ज्या ग्रहाच्या युतीत असतो त्या ग्रहाची नैसर्गीक कारकत्वास बाधा आणतो. खालील प्रकारे सात ग्रहांच्या युतीत राहू आल्यास जी फ़ळे मिळतात ती पाहू.

१. रवि- राहू युती - वडीलांशी न पटणे. वडीलांचे सौख्य न मिळणे. वडिल दुर्धर रोगाने व्याप्त असणे. रवि बलवान असता अचानक सरकारी अधिकार्यांची गैरमर्जी होणे. सरकारी कामात अडथळे असणे. निवडणुकात अपयश येणे या सारखे परिणाम दिसतात.

२. चंद्र - राहू युती - मानसीक स्वास्थ्य नसणे. मातेशी न पटणे किंवा माता रोगाने व्याप्त असणे. सावत्र माता असणे यासारखी फ़ळे दिसतात.

३. मंगळ -राहू युती - स्थावर मालमत्ता खरेदी- विक्रीत अडचणी. स्थावराचे सुख न लाभणे. भावंड नसणे किंवा न पटणे.
४. शुक्र- राहू युती - विवाह विलंब, विवाहात फ़सवणुक. प्रेमभंग इ. फ़ळे दिसतात. जोडीदारासंदर्भात काही अशुभ फ़ळ दिसते.
५. बुध- राहू युती - वाचा स्पष्ट नसणे. त्वचा रोग. मामांशी न पटणे. मातुल घराण्यात दोष दिसतात.
६. गुरु - राहू युती - संतती किंवा उच्च शिक्षणात अडचणी दिसतात.
७  शनि- राहू युती - अपरिमीत कष्ट पडणे. खुप कष्ट करुनही उर्जितावस्था न येणे.

नववे म्हणजे भाग्य स्थान, दहावे म्हणजे कर्म स्थान आणि अकरावे म्हणजे लाभ स्थानी असलेला बलवान राहू व्यक्तीच्या राहू महादशेत जास्त प्रभावी होताना दिसतो.

राहू कुणाच्या तरी युतीत असताना त्या ग्रहाच्या संदर्भात कायमच वाईट फ़ळे मिळतात तर राहू महादशा किंवा अंतर्दशा असताना ती जास्त प्रमाणात दिसतात. या उलट राहू एकटा असताना हीच फ़ळे राहू महादशेत प्रकर्षाने दिसतात.

राहू हा मागील जन्माच्या किंवा मागील अनेक जन्मांच्या कर्म फ़लाचे वहन करताना दिसतो. वर दिलेल्या सात युती मधे त्या कारक ग्रहांच्या फ़लात  न्युनता आणतो तर एकटा असताना मात्र मागील जन्मांच्या कर्मफ़लाचे नुसार व्यक्तीला वर्तन करायला भाग पाडतो.

१. महात्मा गांधी यांनी राहू महादशेत १९२१ ते १९३९ वकिली सोडुन अत्यंत बेभरवशी अश्या राजकारणात प्रवेश केला. आश्रमात व्रतस्थ राहीले.
२. रजनिश उर्फ़ ओशो यांनी राहू महादशेत प्रोफ़ेसर हा पेशा सोडुन त्यांची विचारसरणी स्थापीत करुन भगवान रजनीश नाव धारण केले.
३. जॉर्ज फ़र्नांडीस यांची राहू महादशा मार्च १९७७ ला सुरु झाली. त्याच काळात जनता पार्टी केंद्रात सत्तेवर आली व ते मंत्री झाले.
४. राजीव गांधी यांची राहू महादशा १९७९ साली सुरु झाली व त्यांनी वैमानिक क्षेत्र सोडुन राजकारणात प्रवेश केला. १९८२ साली ते अखिल
   भारतीय कॉंग्रेसचे महासचीव झाले तर १९८४ साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान झाले. त्यानंतरच्या  लोकसभा निवडणुकीत
   कॉग्रेसला अभुतपुर्व यश  मिळुन लोकसभेच्या ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या.
५. अडॉल्फ़ हिटलर यांची राहू महादशा १९३० साली सुरु झाली आणि १९३३ साली त्यांना जर्मनीचे चान्सलर म्हणुन निवडण्यात आले.

या सर्व वरील उदाहरणावरुन लक्षात येते की मागच्या जन्माच्या कर्मफ़ळाचे परिणाम स्वरुप या व्यक्तींना अत्यंत बेभरवश्याच्या क्षेत्रात पाऊल टाकावे अशी प्रेरणा मिळते व आधीचे जीवन सोडुन या मार्गावर ह्या व्यक्ती येतात. राहू महादशेत यांना अभुतपुर्व यश व अधिकार प्राप्त होतात.

काहींना राहू अतिशय उत्तम फ़ळे देतो. अनेक सिनेकलाकारांच्या पत्रिकेत त्यांच्या भरभराटीच्या काळात राहू महादशा असताना दिसते. राहू हा छाया ग्रह आहे. छाया म्हणजे फ़ोटोग्राफ़ी. म्हणुन जे सिनेकलाकार किंवा फ़ोटोग्राफ़र, कॅमेरामन यांच्या पत्रिकेत राहू कलेच्या स्थानी असतो त्यांना भरभरुन यश देतो.

१. अभिनेता दिलीप कुमार यांना मिळालेल्या १५ अवॉर्ड पैकी आठ अवॉर्डस त्यांच्या राहू महादशेत मिळाले.
२. अभिनेता सुपरस्टार राजेश खन्ना यांची राहू महादशा  १९६४ ते १९८२ या काळात होती. याच काळात त्याला मिळालेले यश सर्वोत्तम होते.
३. अभिनेता धर्मेंद्र यांच्या पत्रिकेत १९६२ ते १९८० पर्यंत राहू महादशा होती.. याच काळात आठ पैकी पाच फ़िल्मफ़ेअर अवॉर्ड मिळाले.
४. अभिनेत्री मधुबाला यांच्या पत्रिकेत १९४५ ते १९६३ या काळात राहू महादशा असताना त्यांनी ५० पेक्षा जास्त चित्रपटात भुमीका केल्या.
५. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पत्रिकेत १९८२ ते २००० सालापर्यंत राहू महादशा असताना त्यांचे सिनेमे खुप गाजले व त्यांना अवॉर्ड मिळाले.

अनेकांना राहूची महादशा फ़ारशी चांगली जात नाही. त्यातही राहू महादशा आणि त्यात शनि अंतर्दशा हा कालखंड हमखास पीडा सहन परायला लावतो. दशमेश बलवान नसता या काळात धंदा बसतो किंवा नोकरी सुटते. तग धरुन राहीले तरी खुपच मनस्ताप सहन करायला लागतो. व्यक्तीने ठरवलेली स्वत: ची उद्दीष्टे आणि वर्तन यात फ़रक दिसु लागतो. व्यक्ती घर सोडुन निघुन जाणे. नको त्या व्यसनात अडकणे. हीन लोकांच्या संगतीत आयुष्य घालवणे अशीही फ़ळे या १८ वर्षाच्या राहूच्या महादशेत दिसतात.

यावर उपाय काय असा प्रश्न विचारला जातो. उ रां राहवे नम: या राहूच्या मंत्राचा जप १८ हजार संख्येने केल्यास ज्यांना राहूच्या महादशेत मनासारखी फ़ळे मिळत नाहीत त्यांना ती मिळु लागतात. गायत्री मंत्राच्या जपाने कर्मफ़ल निवृती होते. जर राहू एखाद्या व्यक्तीला विपरीत फ़ळे देत असेल अश्या व्यक्तीने अनुष्ठान पुर्वक दररोज गायत्री मंत्राचा जप केल्यास वाईट कर्मफ़ळांची निवृती होऊन सुख लाभते.

हर्षल एक ताकदवान ग्रह

भारतीय ज्योतिष अभ्यासात नऊच ग्रहांचे स्थान हजारो वर्षे होते. पैकी सात ग्रहांना त्याच्या डोळ्यांना दिसून येण्यामुळे विषेश महत्व आहे तर राहू आणि केतु यांचा ग्रहांचे वास्तविक अस्तित्व नसले तरी त्या काल्पनिक बिंदुंच्या साहचर्याने अनेक शुभ ग्रह शुभ फ़ल देण्यास असमर्थ होतात तर अशुभ ग्रह पराकोटीचे अशुभ होतात हे फ़ल ज्योतिषाने मान्य करुन ज्योतिर्गणित आणि तर्काच्या उच्च अभ्यासाने जगाला आमचाही देश विद्वानांचा देश आहे हे दाखवून दिले.

हर्षलचा उल्लेख ज्योतिषाचा अभ्यासात कुठे कुठे येत असला तरी जी मान्यता नवग्रह स्त्रोत्र, नवग्रह पीडा हर स्त्रोत्र, नवग्रह हवनाचे मंत्र,  धार्मिक विधीत ग्रहमंडळांचे स्थान ज्या प्रमाणे दिसते तरी कुठे तरी ज्याला इंद्र म्हणुन संबोधले गेले आहे.  अश्या हर्षल ग्रहाचा फ़ारसा अभ्यास झाला नसावा किंवा असल्यास तो अप्रकाशीत असावा. सर विल्यम हर्षल याम्नी हर्षल या ग्रहाचा शोध  १३ मार्च १७८१ हा ग्रह शोधल्याचे पाश्चात्यांनी मान्य केले. सर विल्यम हर्षल खगोलशास्त्रज्ञ होते.

प्रश्न असा पडतो की अस्तित्वात नसणार्या  पण परिणाम दाखवणार्या राहू आणि केतु या काल्पनिक बिंदुचा शोध भारतीय लाऊ शकत होते तर  खुप दुर अंतरावर असलेल्या हर्षलच्या परिणामांचा अभ्यास भारतीय अभ्यासकांना का केला नसावा? ज्याला इंद्र म्हणुन संबोधले जाते तो पुराणातला देवराज इंद्र म्हणजेच हर्षल की ती संकल्पना वेगळी यावर अजुन विचार व्हावा असे वाटते.

वासंतीक अंकात हर्षलला समाविष्ठ करुन घेण्याचे कारण ७ ऐप्रिलला हर्षल राशीबदल करुन मेष राशीत येत आहे. मेषेत हर्षल येणे हे ८४ वर्षांनी घडत आहे. ८४ वर्षांपुर्वी म्हणजे साधारण १९३३ सालानंतर भारतात किंवा जगात मेषेतल्या हर्षलने काय काय घडवले याचा शोध घेऊन आताची सात वर्षे कशी जातील याचे अनुमान करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.

साधारण पणे १९३३ साल म्हणजे आर्थीक महामंदीतुन बाहेर पडल्याचे वर्ष. त्या आधीची ३ वर्षे १९२९ ते १९३२ महामंदी होती. अर्थातच केवळ हर्षल मीन राशीत होता म्हणुन हे घडले असे कुणी म्हणेल तर हे चुकच ठरण्याची शक्यता आहे.  पण मेषेत हर्षल असताना दुसर्या महायुध्दाला कारण ठरलेल्या अनेक घटना घडल्या आहेत. मेष ही रास मुळात आक्रमक, अग्नी रास त्यात हर्षलला मंगळाचे मोठे स्वरुप आणि ते ही स्फ़ोटक असे मानले जाते. यादृष्टीने पुढील सात वर्षे भारतास कशी जातील हा सुध्दा स्वतंत्र विषय आहे.

मेष राशीत हर्षल गेल्याने मेषेत खास करुन अश्विनी नक्षत्र यावर काय परिणाम घडतात हे पहाणे पुढील काही दिवस आवश्यक ठरावे त्याच बरोबर ज्या राशीतल्या ग्रहांबरोबर हर्षल केंद्र योग, नवपंचम योग आणि प्रतियोग करेल त्याचे परिणाम वेगवेगळ्या राशींना कसे मिळतील हे पहाणे या लेखाचे उद्दीष्ट आहे.

आपले नविन पंचांग २८ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१८ या कालावधीसाठी असल्याने ह्या कालावधीतले विवीध ग्रहयोग उपलब्ध आहेत. सर्व प्रथम एक नमुद करावेसे वाटते की ज्या पालकांची खास करुन तरुण मुले आहेत ज्यांना समज नाही पण अंगात रग आहे. साधने जसे की मोटर सायकल्स व कार्स , मोबाईल फ़ोन किंवा इंटरनेट इ. आणि ज्यांची रास मेष आहे अश्या पालकांनी पुढील ७ वर्षे आपल्या पाल्याची मनस्थिती दररोज समजुन त्यावर आधीच विचार करुन ठेवला पाहिजे. आपला पाल्य मोटरसायकल घेऊन कॉलेजला जातो आहे. तो काहीतरी मागणी करतो आहे जी आपल्याला पुर्ण करणे शक्य नाही अश्या वेळी पालकांनी आपली अगतिकता समजाऊन मुल डोक्यात राख घालुन घेणार नाही यावर भर दिला पाहिजे. " मिळणार नाही" हा शब्द प्रयोग करण्याऐवजी "मला शक्य नाही तु समजाऊन घे. आपण घेऊ पण आत्ता नाही" असे शब्द प्रयोग जास्त गरजेचे आहेत.

मुलांचे वय, खास करुन तरुण मुलांचे सर्व हट्ट पुरवण्याची समाजाची मानसीकता, न मिळाल्यास येणारे आजच्या तरुणांना वैफ़ल्य आणि वैफ़ल्यातुन घडणार्या आततयी कृती याला खास करुन मेष राशीच्या मुलांना हा हर्षल अजुनच जोरकस साथ देणार असे हे ग्रहमान आहे. आता सर्व संपले असे नसुन आपले संस्कारच तारुन नेणार आहेत. पुर्वी आज्या १०० पर्यंत आकडे म्हणायला सांगायच्या त्याची आठवण होत आहे. अश्या मुलांना तिखट, चमचमीत दररोज खायला न देता बुध्दी शांत राहील असा दही भात किमान उन्हाळ्यात तरी द्यावा असे आवर्जुन सांगावेसे वाटते. तरुणांच्या रांगड्या कृती, कॉलेजातल्या निवडणुका त्यातुन निर्माण होणारे शत्रुत्व यासर्वांवर लक्ष देणे गरजेचे आहे. एकतर्फ़ी प्रेम व त्यातली अगतिकता. टोकाला जाण्याची मनोवृती असणारी मुले ही खासच लक्ष देण्याचा विषय असणार आहे. अर्थातच कर्क राशींच्या आयांच्या हृदयात धस्स होऊन त्यांनी आत्तापर्यंत हातात मोबाईल घेऊन नवर्याचा नंबर फ़िरवला असेल. पण लक्षात ठेवा ज्यांची मेष रास आहे ती सर्वच मुले असे करत नाहीत. आपण ह्या शक्यतावर बोलत आहोत.

आता पुढील वर्षातले हर्षलचे विवीध ग्रहयोग आणि परिणाम पाहु.

चंद्र आणि हर्षलची युती या वर्षात किमान १२ वेळा होणार आहे. ही युती मेषेत होणार आहे. चंद्र मनाचा कारक असल्याने हा योग फ़ारसा चांगला नाही. मेष राशीच्या अश्विनी नक्षत्रावर जन्माला आलेल्या मंडळींनी, मुळात मानसीक त्रास असलेल्या व्यक्तींनी याबाबत लक्ष देऊन हर्षलच्या या परिणामाला प्रतिकारक उपाय करावेत. चंद्रा बरोबर हर्षल शुभयोग सुध्दा करतो. या वर्षात असे योग २४ वेळा होतील. सिंह रास किंवा धनु रास असलेल्या व्यक्तींना या मेषेतल्या हर्षलशी शुभयोगाने काही चांगले घडेल. त्यांच्या हातुन चांगले लेखन घडेल किंवा मानसीक एकाग्रता साधली जाऊन काही नाविन्यपुर्ण गोष्टी घडताना दिसतील. सिंहेच्या मघा नक्षत्राच्या व्यक्तींना आणि धनु राशीत मुळ नक्षत्राच्या व्यक्तींना हा अनुभव जोरदार येईल.

हर्षलची बुधाबरोबर युती २८ ऐप्रीलला होईल. ज्यांच्या मुळच्या कुंडलित  कर्क, तुळ, मकर राशीत हर्षल बुध युती जर असेल त्यांना हा योग त्रास देताना दिसेल. बरेच वेळा बुध -हर्षल युतीत बुध बलवान नसता बिघडतो. अश्यावेळी अपस्मार किंवा स्मृती जाणे असे प्रकार दिसतात. बुध आणि हर्षल यांचे शुभ योग मात्र उत्तम बुध्दीमत्ता असलेल्यांच्या पत्रिकेत दिसतात. मुळच्या बुध्दीमान असलेल्या सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या बुध्दीमत्तेची चुणूक लोकांना दिसेल असे योग येताना दिसतील. या राशीच्या ज्योतिषांचे भविष्य आश्चर्यकारक रित्या बरोबर असल्याचे दिसेल.

हर्षलची शुक्राबरोबर युती ३ जूनला होत आहे. शुक्र आणि हर्षल हे युतीत असणे वैवाहीक सौख्यासाठी फ़ारसा चांगला योग नसतो. पण शुक्राबरोबर होणारे हर्षलचे शुभयोग मात्र सर्व कलेंच्या साठी पोषक असतात. आजकाल कोणत्याही कलेत पारंपारीक तंत्रे न वापरता कॉप्युटरचा वापर वाढत आहे. ज्यांच्या पत्रिकेत शुक्र सिंह राशीत किंवा धनु राशीत आहे अश्या लोकांना याचा जोरदार फ़ायदा होताना दिसेल. ज्यांचा शुक्र पुर्वा किंवा पुर्वाषाठा नक्षत्रात आहे ते लोक कॉप्युटर्स च्या माध्यमातुन कला मग ती फ़ोटोग्राफ़ी असो की ग्राफ़ीक डिझाईन्स, प्रचंड प्रगती करताना दिसतील.

हर्षलची मंगळाबरोबर युती अजुन अंदाजे २४ महिन्यांनी होईल तेव्हा स्फ़ोटक परिस्थिती पाकिस्थानची झालेली असेल. पण जेव्हा जेव्हा कर्क, मकर राशीत हर्षलचा अशुभ योग नजिकच्या काळात मंगळाबरोबर होईल तेव्हा अनुक्रमे १८ जुलै आणि १७ जानेवारीच्या २०१८ च्या सुमारास पाकिस्थानबरोबर कुरबुरी वाढलेल्या दिसतील. १८ जुलैच्या दरम्यान पाकिस्थानने दु:साहस केले तर त्याची वाईट किंमत पाकिस्थान पुन्हा भोगेल.

ज्यांच्या पत्रिकेत हर्षल व मंगळाची युती कर्क किंवा मकर राशीत आहे त्यांना ग्रहमान फ़ारसे अनुकूल नाही.

हर्षलचा गुरुबरोबर योग अजुन लांब आहे त्यामुळे त्याबद्दल लिहीणे सध्या मी टाळले आहे.

हर्षल शनि बरोबर या वर्षी नवपंचम योग करेल. हा योग ज्योतिषशास्त्र दृष्ट्या फ़ार बोलका नाही.

वास्तु दोष खरच आहे का ?

व्यक्तीच्या आयुष्यात दु:ख करायला लावणार्या घटना घडतात. कधी कधी तर दु:ख करायला लावणार्या घटनांची मालीका सुरु होते. कधी कधी आलटुन पालटुन घरातल्या व्यक्ती कधी आजारपण तर कधी तीव्र फ़सवणुक तर कधी अपघात अश्या घटनांना सामोर्या जातात. मग जवळच्या नातेवाईकांच्या कडे या घटना बोलल्या जातात. यातून सल्ला मिळतो तो वास्तु परिक्षा करण्याचा.

दुर्दैवाने दु:ख सहन करणारे कुटुंब कोणतेही लॉजीकल विचार करायला तयार नसते. वास्तु कडे जाण्यापुर्वी काही प्रश्न स्वत:ला विचारायला हवेत.

१. या वास्तुत मी अनेक वर्षे रहात असुन मला आजवर वाईट अनुभव का नाही आला ?
२. गेली अनेक वर्षे या वास्तुत रहात असताना माझी जर प्रगती झाली तर आज अचानक वास्तुत दोष कसा निर्माण होऊ शकतो ?
३. वास्तुमधे माझ्या आयुष्यात माझ्या कुंडलीतल्या वाईट काळावर मात करता येईल अशी शक्ती असते का ?
४. केवळ वास्तुच भरभराट देते का ? असे असेल तर व्यक्तीची पत्रिका, पुरुषार्थ याला काहीच अर्थ नाही का ?
५. वास्तुत दोष असतील तर वास्तु बदलणे, तोड- फ़ोड करुन सुधारणा करणे या शिवाय अन्य काही उपाय असतात का ?

वास्तु ही माणसाला आपली दैनंदीन कार्ये संपल्यावर सुखासमाधानाने भोजन करावे, सुख निद्रा घ्यावी, सुखद घटनांनी नातेसंबंध घट्ट विणले जावेत यासाठी स्वत: निर्माण केलेली व्यवस्था आहे. प्रत्येक व्यक्ती जे काय आठ-दहा तास काम करते ते काम काय करते ? नोकरी- व्यवसाय करताना जोडॊनीया धन उत्तम व्यवहारे या तुकाराम महाराजांच्या उक्तीचा उपयोग करुन धन जोडते की मुंड्या मुरगाळते ? शुद्र स्वार्थापोटी क्षणा क्षणाला विश्वासघात करते की होणार्या परिणामाची कल्पना देत सर्वाना बरोबर नेते या सर्वाचा विचार कधीतरी व्हावा.

जेव्हा अनेकवेळा व्यक्ती अनेकांना फ़सवते त्या कृतीचा परिणाम अश्या दु:खद मालिकामधुन दिसतोच. काही वेळा असे घडते की सामान्य व्यवहार करणार्या व्यक्तीला सुध्दा अश्या मालीकांना सामोरे जावे लागते. घरच्या व्यक्तींच्या एकच राशी किंवा जवळच्या ( वृश्चिक/धनु/मकर ) राशी व एकाच वेळी येणारी साडेसाती किंवा पत्रिकेत शनि अशुभ असताना शनि महादशा/ अंतर्दशा, राहू/ केतू  महादशा/ अंतर्दशा यांचा एकत्रीत विचार न करता एकदम वास्तु दोष सांगणारे वास्तु तज्ञा पेक्षा मला त्यांच्या कडे जाणार्या जातकांना सांगावेसे वाटते की जरा थांबा.
आधी पत्रिकेत काय दोष आहेत याचे प्रथम निवारण करुन घ्या. बरेच वेळा ते कमी खर्चीक असते व जास्त प्रभावी असते.

माझ्या मते जर आपण आपली वास्तु, वास्तुशास्त्राच्या नियमांचा जास्तीत जास्त वापर करुन बांधली असेल आणि वास्तु शांती सारखी कर्मे केल्यानंतर वास्तुत नियमीत देव पुजा, सत्यनारायणासारखे  वार्षीक व्रत, भाद्रपद महिन्यात गणेश स्थापना व पुजन, कुलाचार या सारखे विधी होत असतील तर वास्तु दोष निर्माण होतच नाहीत. आपल्याला जे वाटतात ते दोष आपल्या मनात असतात. घरात एक कोण तरी व्यक्ती सातत्याने जेव्हा निगेटीव्ह विचार करते तेव्हा घरातले स्पंद बिघडतात. याचा अर्थ वास्तुत दोष आहे असे नाही.

जेव्हा सातत्याने दु:खद घटना घडतात तेव्हा हे स्पंद बिघडणे होणे स्वाभावीक आहे. यातुन बाहेर पडुन रुद्र, सप्तशतीचे पाठ, गायत्री मंत्र पठण, नवनाथांच्या लीला, साई लीला, श्री समर्थांच्या लीला, गुरुचरीत्र किंवा श्रीगजाननविजय या सारख्या धार्मीक ग्रंथांचे घरातल्या सगळ्या व्यक्ती असताना वाचन केल्याने हे स्पंद सामान्य होतात. या सोबत, या ग्रंथांची समाप्ती करताना आरती, प्रसाद याने सुध्दा घरातल्या वातावरणात कमालीचा फ़रक पडतो. मी गायत्रीमंत्राने हवनाचे प्रयोग करुन घरातले स्पंद सुधारतात याचा स्वत: अनुभव घेतला आहे.

याच सोबत काही नियमांचे पालन केल्यास वास्तु दोषाची शंकाही मनात येणार नाही.

१. घरच्या कोणत्याही व्यक्तीला रागाऊन न बोलणे. त्याचे अहित व्हावे ही कामना न करणे.
२. घडुन गेलेल्या गोष्टींचा सारखा उच्चार करुन स्वत: दु:ख न करणे व इतरांना दु:ख न देणे.
३. सारखे शिळे अन्न साठवून खाणे टाळावे.
४. रात्री उष्टे घरात साठवून न ठेवता जेवणे झाल्यावर उष्टे घराच्या बाहेर टाकणे.
५. सातत्याने घरात पदार्थ न शिजवता बाहेरचे आणुन खाणे टाळावे.

आजकाल एकत्र कुटुंबे कमी होत आहेत. जी शिल्लक आहेत ती चौकॊनी कुटुंबे आहेत. एकत्र कुटुंबात एकत्र व्यवसायातून येणारे किंवा उत्पन्नाचा असमतोल असताना विभागणी साठी होणारे क्लेश आजकाल फ़ारसे नाहीत. जे काय क्लेश आहेत ते घरातले नियम निश्चित न केल्याने व केले असल्यास त्याचे पालन न केल्याने होणारे आहेत. यावर एकत्र बसुन विचार करुन मार्ग काढणे हा विचारही महत्वाचा आहे.

नावात काय आहे ?

नाव आणि उपनाव किंवा आडणावात बरेच काही सामर्थ्य दडलेले आहे. मुल जन्माला येते तेव्हा त्याचा नामकरण विधी होतो आणि आपण बालकाचे/बालीकेचे नाव निश्चीत करतो. फ़ार पुर्वी पाच नावे ठेवण्याची पध्दत होती. यात एक नक्षत्र नाव असे. नक्षत्र नाव ठेवण्यामागे उद्देश जेव्हा या बालकाचा जन्म कोणत्या नक्षत्रावर त्याच्या कोणत्या चरणावर झाला हे समजण्यासाठी होत होता. मधे अनेक काळ भारत पारतंत्र्यात गेल्याने हिंदुंवर काय काय संकटे आली असतील याची कल्पना नाही पण जी काय चर्चा होती त्यानुसार साधारण पणे राजघराण्यात जन्माला आलेल्या व्यक्तीची जन्मकुंडली मांडली जायची. त्यासाठीची जन्मवेळेची अचुकता साधण्यासाठी घटका आणि पळे मोजण्याची साधने याच श्रीमंत किंवा राजघराण्यात होती. तसेच ज्योतिष अभ्यास करणारे तज्ञ ही त्यांच्याच कृपेने जगायचे.

ह्या सधन किंवा राजघराण्यात जन्माला आलेल्या व्यक्ती शिवाय इतराच्या पत्रिका तयार करण्याची साधने सामान्य व्यक्तींकडे नसायची. अश्यावेळी फ़ार झाले तर कोणत्या नक्षत्राच्या कोणत्या चरणावर बालकाचा / बालीकेचा जन्म झाला हे विचारले जायचे. व त्यावरुन नक्षत्रनाव शोधुन ते लक्षात ठेवले जायचे. पुढे लग्न ठरताना या नक्षत्रनामावरुन नक्षत्र शोधून गुण मेलन केले जायचे. याचा अर्थ ही नक्षत्र नामे दैनंदिन व्यवहारात वापरली जात नसत. ते अशक्य ही आहे. यातील काही चरणाक्षरे इतकी रुक्ष आहेत की मुलांची नावे ठेवताना  टा, टी, टू टे टो षा णा ठा ढा खो था इ. चरणाक्षरांचा वापर करुन मुलांची नावे सुध्दा ठेवणे कठीण आहे तर मुलींची नावे ठेवणे दुरापास्त आहे. था नावावरुन भाजपच्या केंद्रीय मंत्रीमंडळात थावरसिंह गेहलोत नावाचे मंत्री आहेत हे आठवले. पण अशी नावे ठेवणे हा दुराग्रह आहे असेच म्हणावे लागेल.

ही नक्षत्र नामे व्यवहारात वापरणे अशक्य आहे. नावातून काहीतरी अर्थबोध व्हावा असे अपेक्षीत असते. एकतर ते नाव ऐतीहासीक व्यक्तीचे असावे अशी प्रथा आहे जेणे करुन या व्यक्तीचे स्मरण व्हावे. उदा. रामचंद्र किंवा शिवाजी हे राजे किंवा लक्ष्मण , हनुमंत यांच्या सारखे रामाचे भक्त असोत की तानाजी, संभाजी यांच्या सारख्या शिवकालीन व्यक्तीरेखा असोत. पुर्वी मुलींच्या नावात पुर्वा, उत्तरा ही नावे ठेवली की नक्षत्र वेगळे लक्षात ठेवावी लागत नसत. जाई- जुई सारखी फ़ुलांची नावे व्यवहारीक नावात वापरली जायची. नद्यांची नावे ठेवण्याची पण पध्दत होती ज्यातुन अर्थबोध होत असे. नंतरच्या काळात अशी नावे प्रचलीत झाली की याचा अर्थ काय हे समजणे दुरापास्त झाले. यात नाविन्यपुर्ण नावांची जोड मिळाल्याने काही वेळा अर्थहीन नावे सुध्दा ठेवली गेली. याचा उहापोह करणे ह्या लेखाचा उद्देश नाही.

काही नावे ठेवल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटे आली आहेत असे वाटते. किशोर नावाच्या अनेक व्यक्ती आयुष्यभर स्थिरता मिळवण्यासाठी झगडताना दिसतात. ज्योतिषी म्हणुन नावामुळे संकटे आली असे लिहणे किती संयुक्तीक आहे असा प्रश्न मला स्वत:ला पडतो पण हे वास्तव आहे. किशोर नावाच्या व्यक्तीला जीवनभर संघर्ष करावा लागतो. नावाची सुरवात "न" अक्षराने होऊ नये. माझा अनुभव आहे की न अद्याक्षराने सुरु होणार्या व्यक्तींना अचानक संकटाचा सामना करावा लागतो.

अनेक जाणकारांच्या अनुभवातुन यश मिळण्यासाठी व ते टिकण्यासाठी नावात र हे अक्षर असावे असे दिसते. र हे अक्षर रवि ह्या ग्रहाच्या राजाला रिप्रेझेंट करते. यामुळे रविकडे असलेल्या नित्य उदय होण्याचा गुण, शक्ति आणि सामर्थ्य त्या व्यक्तीकडे येते. क्वचित संकटे येतात तेव्हा ह्या व्यक्ती गडबडुन जात नाहीत. पुर्वी नाव काहिही असले तरी पुढे राम जोडण्याची पध्दत भारतभर होती. महाराष्ट्रात अनौपचारीक रित्या नाव लिहीताना पुढे राव लिहीण्यात आदर व्यक्त करताना र ह्या अक्षराचा वापर केला जायचा. पुण्यातील जाणकार ज्योतिषाने आपल्या नातवाचे नाव मुद्दाम रणजीत ठेवावे असा सल्ला त्यांच्या जावयाला दिला हे आज या निमीत्ताने स्मरते.

बंगाल प्रांतात असेच नावाच्या पुढे चंद्र लावण्याची पध्दत अनेक काळ रुढ होती. चंद्र हा ग्रह प्रसिध्दीचा कारक आहे. त्यामुळे बिपीनचंद्र किंवा बंकीमचंद्र ह्या सारखी नावे विलोभनीय वाटत. उग्र व्यक्तीमत्व नसलेल्या आणि कवी मनाच्या किंवा हळव्या पुरुषाच्या नावापुढे असलेले चंद्र हे छान वाटते. ज्यांना लेखक किंवा कवी म्हणुन नावलौकीक व्हावा असे वाटते त्यांनी टोपण नावात चंद्र असलेले नाव धारण करावे. अश्यांना यात नावलौकीक मिळण्याची शक्यता वाढेल. मुळात पत्रिकेत या प्रमाणे योग असावेत हे विसरुन चालणार नाही. चंद्र आणि नेपच्युन सारख्या ग्रहाचे शुभयोग होतात अश्या व्यक्तींना उच्च प्रतिभा प्राप्त होते. अश्या व्यक्तींच्या नावात चंद्र असलेले किंवा शशी असा शब्द असलेले नाव ठेवल्यास हे त्या व्यवसायाला पुरक ठरेल. विधु विनोद चोप्रा या व्यक्तीचे स्वत:चे नाव विधु विनोद आहे. त्याच्या वडीलांचे नाव डी एन चोप्रा आहे. त्याने फ़िल्म इंडस्ट्रीमधे येण्यापुर्वी विनोद या नावापुढे विधु हे चंद्राचे नाव जोडले आहे की नामकरण विधीच्या वेळेलाच त्याचे नाव विधु विनोद असे ठेवण्यात आले याबाबत इंटरनेटवर माहीती मिळली नाही पण पटकथाकार व्यक्तीच्या नावात चंद्र असायला हवा.

बिहार सारख्या राज्यात नावापुढे कुमार लावणे अशी एक प्रथा आहे. ही प्रथा इतकी प्रभावी आहे की इंग्रजीत नावाची इनेशियल्स तयार करताना सुरेश कुमार शर्मा नावाचा व्यक्ती एस के शर्मा असे नाव लावतात. वडिलांच्या नावाचे अद्याक्षर वापरले जात नाही. ज्योतिषशास्त्रात कुमार मंगळ ग्रहाचे नाव आहे. जे आपल्या नावापुढे कुमार लावतात त्यांना मंगळाच्या शक्तिचा वरदहस्त प्राप्त होतो. पोलीसखाते, डिफ़ेन्स मधे नोकरी करणार्या व्यक्तींचा मंगळ प्रभावी असावा लागतो. ज्यांच्या पत्रिकेत दशमस्थानी मंगळ आहे अश्या व्यक्तींना पोलीसखाते किंवा सैन्यात नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते. अश्या व्यक्तींचे नाव ठेवताना पहिल्या नावापुढे कुमार जरुर लावावे.

प्रत्येक जन्माला आलेल्या व्यक्तीच्या पत्रिकेत भाग्य वाढविणारा ग्रह शोधून त्याच्या नावाचा उपयोग नामकरण करताना केल्यास त्या व्यक्तीचे भाग्य वाढेल.  अर्थातच तज्ञ ज्योतिषाच्या सल्याने हे करावे. अशुभ स्थानांचा अधिपती असलेल्या ग्रहाच्या नावाचा उपयोग नामकरणात झाला तर ते सुखावह असणार नाही. नावात भाग्य वाढविणारा ग्रहाचे नाव जोडावे असा सरसकट आग्रह न धरता पत्रिकेचे आकलन करुन मगच आवश्यकता असल्यास तसा सल्ला देणे इष्ट ठरेल.

भीमरुपी एक प्रभावी स्तोत्र

माणसाला अनेक वेळा अनेक संकटाचा सामना करावा लागतो. अश्यावेळेला अजुन काही उपाय आहे का ज्यातुन संकंटातुन मुक्ती, छोट्या अडचणीतुन मुक्ती मिळेल. जेणेकरुन दररोजचे काम व्यवस्थीत पार पडेल असे विचारले जाते. ह्या वासंतीक विशेषांकाची रचना होताना एका साधकाने यांनी त्यांचा वैयक्तीक अनुभव सांगीतला. ते  प्रिंटींग प्रेस चालवतात. व्यवसाय करताना अनेक तारेवरच्या कसरती कराव्या लागतात. भीमरुपी या स्त्रोत्रपठणाने संकटे कशी टळत होती याचा अनुभव त्यांच्याच शब्दात वाचा.


२००८- २००९ तो काळ आयुष्यातला खुप खडतर काळ होता. प्रिंटींग व्यवसाय आकार घेत होता. अश्यावेळी एका मोठ्या ऑफ़ीसमधुन बोलावणे आले. जे काम कोणी करायला तयार नव्हते ते मला दिले गेले कारण काम किचकट  प्रोसेसचे होते. जवळ भांडवल नव्हते. कोणी कागद पैसे अ‍ॅडव्हान्स न देता  देईल अशी ओळख कागद बाजारात तयार झालेली नव्हती. स्वत: ची प्रिंटींग प्रेस नव्हती. मी रहायला पुण्याच्या उपनगरात होतो. कामे सर्व पुण्यात चालत. जवळ एक बजाजची  स्कुटर. यावर मी दिवसा रात्री प्रवास करुन पुण्याला जात असे. स्कुटर चालवताना आणि वेळ मिळाला की मी भीमरुपी महारुद्रा या स्त्रोत्राचे सतत पठण करत असायचो.

कंपनी अधिकार्यांनी मी माझ्याकडे भांडवल नसल्याचे सांगीतले. पहिलेच आश्चर्य असे की  मला थोडासा अ‍ॅडव्हान्स मिळाला. कंपनी अधिकारी म्हणाले देखील की आम्ही कोणाला अ‍ॅडव्हान्स देत नाही. पण तुम्हाला देतो. या घटनेवर मी आश्चर्य करत राहीलॊ आणि प्रिंटींग प्रेसच्या मालकाकडे जाऊन मला वेगाने प्रिटींग करुन देण्यास सांगीतले. दुसरे आश्चर्य असे की हे प्रिंटींग प्रेस मालक कोणत्याही अ‍ॅडव्हान्स शिवाय माझे काम करुन देण्यास तयार झाले. जे प्रिंटींग करायचे तो मजकुर तयार झाला. त्याचे प्रुफ़ रिडींग संपले. आता हवा होता कागद.  मी एका कागद व्यापार्याला फ़ोन केला आणि कागद अ‍ॅडव्हान्स शिवाय देण्याची विनंती केली. माझे भांडवल इतकेच होते की ज्यांची मी कामे आजपर्यंत सच्चेपणाने केली ते चांगले व्यावसायीक मित्र झाले. त्यांची नावे मी कागद व्यापार्याला सांगीतली. एकच दिवस गेला नसेल तर त्या कागद व्यापार्याचा फ़ोन आला. कागद कोठे पाठवु असे विचारुन त्याने माझा ताण संपवला.

प्रिंटिंग सुरु झाले आणि पहिल्या काही प्रिंटीगचा लॉट होताना काही तांत्रिक दोष आला. मी रात्रभर थांबुन प्रिंटींग पहात होतो. रात्री उशीरा पुण्याहून घरी येऊन या आनंदात झोपलो की आत सर्व अडचणी संपल्या. पण संकटे संपत नव्हती. तांत्रिक दोष पहायला प्रिंटीग प्रेस मालकाने मला सकाळी बोलावले. मी अंघोळ करुन स्कुटरला किक मारली आणि भीमरुपीचे पाठ करत पुण्याकडे निघालॊ.

मुखाने पठण चालु होते तरी डोक्यातले विचार संपत नव्हते. त्या नादात शिवाजीनगर जवळ माझ्या स्कुटरची धडक एका  दुचाकीस्वार महिलेला बसली. मी पडलो, ती ही पडली. मला लोकांनी बाजूला नेले. माझी स्कुटर उभी करुन ठेवली. मी काहीच बोलत नव्हतो. बाकीचे लोक त्या महिला दुचाकीस्वाराला तिची चुक कशी ते समजावत होते. थोड्यावेळाने ती स्त्री आपले वहान घेऊन निघुन गेली. यातुन पोलीस तक्रार न होता किंवा दोघांनाही गंभीर दुखापत न होता संकट टळले होते.

दोन्ही गुढगे या अपघातात जखमी झाले होते. प्रेस मधुन लवकर येण्यास फ़ोन येत होता. मी स्कुटरला कीक मारली आणि निघालो. अजुन एक संकट आले म्हणजे पुढे गेल्यावर स्कुटरची दोन्ही चाके एकावेळी पंचर होऊन स्कुटर थांबली. स्कुटरला धक्का मारुन बाजूला कशी बशी घेतली पण ढकलत पंचर दुरुस्तीला टाकावी असे बळ नव्हते.

मी प्रेसच्या मालकांना फ़ोन केला. त्यांना अडचण सांगीतली. ते त्यांच्या दुचाकीवर ओळखीच्या पंचर रिपेअर करणार्या व्यक्तीला घेऊन आले. त्याच्या ताब्यात माझी स्कुटर देऊन मला त्यांच्या दुचाकीवर मागे बसवून प्रेसवर घेऊन गेले. मी परत भीमरुपी हनुमंताचे स्मरण करुन तांत्रीक दोष शोधण्यास सुरवात केली. लगेचच कागदाचा हा लॉट अपेक्षीत साईझपेक्षा कमी साईझचा आल्याने हा तांत्रीक दोष येत असल्याचे कारण कळाले. मी लगेच तो लॉट बदलुन दुसरा लॉट लावायला सांगीतल्यावर तांत्रीक दोष गेला व लाखो प्रती त्याही अनेक पानांच्या असे आव्हान असलेल्या प्रिंटींगचे काम सुरु झाले.

हे सर्व होईपर्यंत स्कुटरचे पंचर निघुन चालु स्थितीत हातात मिळाली. भांडवल नसताना, पत नसताना सुरु केलेला व्यवसाय कष्टाने उभा राहीला आणि मी मागे वळून पाहिलेच नाही. अशी अनेक कामे मिळाली. पार पडली. फ़ायदा झाला. अनेक व्यावसायीक मित्र मिळाले जे आज एका फ़ोनवर सेवा देण्यास तयार आहेत. आजही हा व्यवसाय सुरु आहे. कठीण काळात तरुन जाणे केवळ भीमरुपीच्या पठणाने शक्य झाले.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 हनुमान ही संकटमोचन करणारी देवता आहे. प्रभु रामचंद्रांच्या रावणाबरोबरच्या युध्दात अनेक कठीण प्रसंग आले. यातुन रामाला सहाय करुन युध्द जिंकण्यास हनुमंता शिवाय अन्य याची कल्पना करता येणार नाही. महाभारतात सुध्दा हनुमंत प्रत्यक्ष सहभागी झाले नाहीत तरी अर्जुनाच्या रथाचा  ध्वज त्यांनी संभाळला. मध्यंतरी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना हनुमंताची उपासना करुन छोटी मुर्ती जवळ ठेवावी अशी इच्छा झाली असे वृत वाचण्यात आले.

ज्यांना हनुमान चालीसा पाठ करणे भाषेच्या अडचणीमुळे शक्य नसते अश्यांनी भीमरुपीचे पाठ केल्याने तेच फ़ळ प्राप्त होते. अश्या संकटांशी सामना करण्याचे धैर्य प्राप्त होतेच या शिवाय संकतातुन बाहेर पडण्याचा मार्ग श्री हनुमान दाखवतात. ज्यांना नित्य वहान चालवावे लागते त्यांनी वहानात उडणार्या मारुतीचे चित्र स्थापन करावे. वहानामुळे येणार्या संकटावर हा प्रभावी मार्ग आहे.

हनुमंताच्या उपासनेने मंगळ अशुभत्व निवारण होते. शनिचे अशुभत्व निवारण होते अशी ही देवता नित्य स्मरावी.


एक नाड दोष संशोधन

विवाह गुणमेलन करताना एक नित्यांची अडचण येते ती म्हणजे बरेच वेळा गुण १८ पेक्षा जास्त आहेत, दोघांनाही मंगळ दोष नाही पण एकनाड दोष आहे. अश्यावेळी पारंपारीक मतांचा आधार घेत विवाह टाळा सांगणे अनेक वेळा शक्य नसते कारण मुलगा - मुलगी आधीच वयाने मोठे असतात आणि लग्न होत नाही या अडचणीने ग्रासलेले असतात. काही वेळा विवाह आधीच ठरलेला असतो. औपचारीकता म्हणुन कुंडल्या दाखवल्या जातात ज्यात एकनाड दोष दिसत असतो.

एकनाड दोषाने संतती होण्यात दोष निर्माण होतो असे पारंपारीक मत आहे. पण वधु वरांचे पंचमेश आणि गुरु निर्दोष असतील तर अशी भिती मनात ठेवायचे कारण नाही. दुसरे म्हणजे एकनाड दोषाने संतती होण्यात दोष होत हे मत कुठल्या काळातले आहे हे तपासले तर ज्या काळात संतती म्हणजे संपत्ती मानले जायचे त्या काळातील आहे. जेव्हा अधीक मुले असली पाहीजेत अशी सामाजीक मते होती अश्या काळात संतती होण्यातले अडथळे खरच मोठे होते.  कारण त्या काळात संतती जन्मातले अडथळे दुर करणारे वैद्यकीय शास्त्र प्रगत नव्हते. आज जर पत्नीचा निगेटीव्ह ब्लड ग्रुप असेल आणि पतीचा जर पॉझेटीव्ह असेल तर जे दोष उत्पन्न होतात त्यावर इंजेक्शन्स निघाली आहेत. टेस्ट ट्युब बेबी हा पर्याय आहे. यातील दोष दुर करुन किमान अल्पसंतती देऊ शकेल इतकी उत्तम प्रगती वैद्यकीय शास्त्राने केलेली आहे.

जर १८ पेक्षा गुण जास्त आहेत, मंगळ दोष नाही, पण एक नाड दोष आहे अश्यावेळी जर पंचमेश आणि गुरु ह्या संततीकारक स्थान आणि ग्रहांचे दोष नसतील तर ही कॅलक्युलेटेड रिस्क मुलाच्या व मुलीच्या आई वडीलांनी तसेच मुलगा आणि मुलगीने विचारपुर्वक घ्यावी असे माझे मत आहे.

दाते पंचांग यांनी ह्या दोषाचा उहापोह करताना रक्त गट तपासणे हा एकनाड दोषावर पर्याय नाही असे सांगुन टाकले आहे. अश्यावेळी अजुनही  संशोधन होऊन जातकांना एकनाड दोषाबाबत खात्रीलायक सल्ला देता येईल का ? या साठी मला एक प्रकल्प ( Project ) करायचा आहे. यासाठी ज्योतिषप्रेमी आणि संशोधनाचे मतास पुरक असलेले ज्योतिषी तज्ञ यांनी पुढे यावे असे मी आवाहन करतो.

 एकनाड असताना संतती होण्यात दोष निर्माण होतो का ? या हायपोथेसीस वर आधारीत संशोधन करण्यासाठी ज्यांनी जाणिव पुर्वक किंवा अनवधानाने हा दोष असताना लग्न केले आहे अश्या एक हजार जोडप्यांच्या कुंडल्या जमा करुन त्याचे संशोधन करुन निष्कर्षाप्रत येणे मला अपेक्षीत आहे.  पाच किंवा दहा पत्रिकांचा विचार करुन नि्ष्कर्षाप्रत येणे मला स्वत: ला योग्य वाटत नाही कारण संख्याशास्त्रीय ( Statistical ) कसोटीला वापरुन केलेले संशोधन हे संशोधनाच्या जगमान्य पध्दतीत बसते. यामु्ळे निष्कर्ष सहसा चुकत नाहीत व पुढील संशोधनासाठी ते पुरक ठरते. या संशोधनाला खुप डाटा जमा करावा लागणार आहे. त्यावर काम करावे लागणार आहे आणि त्यासाठी वेळ ही लागणार आहे. जितके जास्त ज्योतिषप्रेमी आणि तज्ञ ज्योतिषी यात सहभाग घेतील तितके हे संशोधन लवकर पुर्ण होईल.

या संशोधनाचा डाटा जमा करण्यासाठी मी गुगल डॉक्युमेंटचा वापर करत आहे. ज्याची लिंक वापरुन डाटा कलेक्षन फ़ॉर्म भरला तर डाटा एकत्रीकरणाचे काम सोप्पे होणार आहे.  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScf57H52338IwQBmhhTIQaPRTaPx5BlVCMMHlirl6gCpN4pIQ/viewform

ज्योतिषप्रेमी व्यक्ती आपण ह्या संशोधनासाठी खालील प्रकारे मदत करु शकता. ज्योतिषी तज्ञ व्यक्ती आपल्या कडील डाटा जोडप्याच्या संमतीने मला पाठवु शकतात.

१. आपल्याला स्वत:ला आपण एकनाड असताना विवाह केला असेल तर आपली माहिती कळवावी.
२. आपल्या ओळखीच्या जोडप्याने खात्रीने एकनाड दोष असताना विवाह केल्याची माहिती असल्यास त्यांना त्यांची माहिती स्व इच्छेने  देण्यास  प्रवृत करावे.
३. हा अंक किंवा लेख अनेक जोडप्यांपर्यंत पोचवावा म्हणजे त्यांना तुमच्या मार्फ़त संपर्क करण्यास संकोच वाटत असेल तर संपर्काचा मार्ग खुला होईल.
४. मराठी भाषेत हा लेख वाचणे शक्य नसलेल्या अन्य भाषीक / परदेशी लोकांना या प्रकल्पाची माहिती देऊन त्यांना या प्रकल्पात भाग घेण्यास प्रवृत करावे.
५. जोडप्यांची प्रार्थमीक माहीती जमा करुन त्यांची एकनाड असल्याची खात्री करुन मग गुगल ची लिंक वर डाटा पुढे पाठवणे.
६. आर्थीक मदत करणे.

जर डाटा लवकर जमला तर संख्याशास्त्रीय पध्दतीने संशोधन करण्यास काही काळ लागेल. नंतर यावरचे संशोधनात्मक मत आपल्यापर्यंत नक्षत्रप्रकाशच्या माध्यमातुन प्रकाशीत केले जाईल.

सर्वांनी या विषयाच्या संशोधनाला सहकार्य करावे ही विनंती.

नवग्रह पीडा हर स्त्रोत्र एक प्रभावी उपाय.

मनुष्य प्राणी विवीध प्रश्नांनी त्रस्त असतो. कधी विवाहाचा प्रश्न, कधी संततीचा तर कधी नोकरी व्यवसायाचा. नेमका काय उपाय केला म्हणजे ग्रहपीडा कमी होईल असा प्रश्न विचारला जातो.  मनुष्य प्राण्याला आयुष्यात जे काही भोगावे लागते ते कर्म फ़ळ असते. कर्माचा सिध्दांत नावाचे हरीभाई ठक्कर यांनी लिहलेले मुळचे पुस्तक अनेक भाषात भाषांतरीत होऊन मराठीत आले. गेल्या अनेक वर्षात अनेक अवृत्या संपल्या आहेत. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण ह्या प्रकाराने कर्मफ़ळे मिळतात असे हरीभाई ठक्कर अनेक वेद, उपनिषदांचा हवाला देऊन म्हणतात. त्यांचे म्हणण्यानुसार ज्या कर्माचे फ़ळ तात्काळ मिळते ते क्रियमाण फ़ळ आहे. जसे मी एखाद्या माणसाला गैरसमजातून अपशब्द बोललो तर तो संधी असेल तर तात्काळ उत्तर देईल. क्रियमाण प्रकारात मी एखाद्या व्यक्तीचे अहित करण्याच्या दृष्टीने वागलो आणि ते त्याला लवकर समजले नाही. जेव्हा समजेल तेव्हा तो त्याचा बदला घेईल. प्रारब्ध प्रकारात मागच्या जन्मी केलेल्या कर्माचे फ़ळ या जन्मी भोगावे लागते. हे कर्मफ़ळ अतिशय तीव्र असते. आयुष्याला पुरणारे दु:ख हे त्या प्रकारात मोडते. संचित आणि क्रियमाण फ़ळ आपल्याला का मिळाले याचा विचार केला असता असे लक्षात येते की त्याचे कारण काय आहे. परंतु आपण मागच्या जन्मी केलेल्या कर्माचा आपल्याला विसर पडलेला असतो आणि काही केल्या त्याचे कारण लक्षात येत नाही.

मागचा जन्म असतो की नसतो या वादाच्या मुद्यात पडणे या लेखाचा उद्देश नाही. ज्या अर्थी ज्यांना अजिबात स्वार्थ नव्हता ते तुकाराम महाराज आपल्या मागील जन्माबाबत सांगतात. अंबऋषी, प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामया व शेवटी तुकोबा हा जन्मक्रम ते स्वत: सांगतात.  ते सामान्य व्यक्तीने मान्य करावे. आज लास्ट बर्थ रिग्रेशन नावाची परदेशी मानोसपचार तज्ञांनी सांगीतलेली थेअरी सुध्दा हिंदुंच्या पुनर्जन्माच्या संकल्पनेला दुजोरा देते.

ज्योतिषाने या कर्मफ़ळाचा मागोवा घेता येतो व त्यातल्या त्यात अपरिपक्व अशुभ फ़ळे उपाय करुन सौम्य करता येतात किंवा संपतात.

माझ्या एका मित्राची तीन लग्ने आत्ता पर्यंत मोडली आणि अल्पकाळ सुध्दा त्याला वैवाहीक सौख्य मिळाले नाही. एका व्यक्तीचे लग्न झाले आहे पण त्याची पत्नी आणि ही व्यक्ती क्वचीत एकमेकांशी उत्तम संवाद साधतात. एका व्यक्तीला मोठ्या कष्टाने नवसाने संतती झाली. हा मुलगा वय ३२ झाले तरी लग्न करत नाही या कारणाने आई- वडील दु:खी आहेत. एका व्यक्तीला आयुष्यभर नोकरी-व्यवसाय जमला नाही.

वरील सर्व प्रारब्ध म्हणजे तीव्र कर्म फ़ळे आहेत. यज्ञ केल्याने किंवा अन्य कोणत्याही मार्गाने ही कर्मफ़ळे संपत नाहीत. हे दु:ख आयुष्यभराचे असते. मी नेमके काय कर्म मागच्या जन्मी केले याचे उत्तर भृगुसंहीता या ग्रंथात वाचावयास मिळते. भृगुसंहीता ग्रंथात याचे उपाय दिले आहेत. त्याचा उपयोग करुन हे दु:ख कमी होते पण संपुर्ण पणे वेगळेच किंवा उत्तम फ़ळ मिळाले असे घडत नाही. शेवटी ते कर्मफ़ळ स्विकारायची मानसिकता तयार होऊन माणुस त्यावर तडजोड करुन पुढे जातो.

जी कर्मफ़ळे क्रियमाण आहेत ती तात्काळ मिळुन जातात. त्यावर ती टाळायला अवधी मिळत नाही असे सांगीतले जाते. पण ही फ़ळे अल्पकाळ भोगावी लागतात त्यामुळे तो एक अपघात होता असे समजून आपण ते स्विकारून तो विचार संपतो. पण जेव्हा फ़ळे दिर्घकाळ भोगावी लागतात अश्यावेळी त्यावर काही उपाय आहे का हा प्रश्न विचारला जातो.

अनेक शास्त्रकारांनी विधीयुक्त ग्रहांच्या मंत्रांचे हवन हा प्रभावी उपाय सांगीतला आहे. सध्याच्या काळात हवन हे सोपे नाही. हवनासाठी योग्य पुरोहीत हवा. भुमीवर अग्नी नसताना केलेली हवने निष्फ़ळ होतात असे मानणारा एक वर्ग आहे. हवनांच्या संख्येबाबत एकवाक्यता असली तरी कलीयुगात हीच संख्या चार पट असावी असेही मत जाणकार व्यक्त करतात. या शिवाय त्याचा खर्च ही खुप असल्याने हा मार्ग सहजपणे सांगीतला जात नाही. सांगीतला तरी यज्ञकर्माचे तात्काळ फ़ळ मिळणे अपेक्षीत असताना ते मिळत ते न मिळाल्याने एकंदरीत या मार्गावरची श्रध्दा संपेल की काय अशी अवस्था निर्माण झाली. आहे.

मंत्रयुक्त हवन किंवा यज्ञकर्माचा मार्ग अत्यंत प्रभावी असला तरी वरील कारणांमुळे त्याऐवजी जप हा दुसरा प्रभावी मार्ग सांगीतला आहे. अशुभ ग्रहाचा मंत्र स्वत: जपल्याने त्या ग्रहाचे अशुभफ़ळ कमी होते किंवा संपते असा अनुभव आहे. यासाठी काही तंत्रे आहेत. हा मंत्र संकल्प पुर्वक एका ठराविक संख्येने दररोज म्हणला पाहीजे. हा जप शक्यतो एकाच जागी ठरवुन म्हणजे घरातली ठरावीक जागा या ठिकाणी करावा. संकल्प केलेली संख्या ठराविक दिवसात पुर्ण झाली पाहिजे. दररोज, काही गायत्री मंत्र दररोज म्हणला पाहिजे म्हणजे संकल्पयुक्त जपाचे फ़ळ त्या विशिष्ठ कर्माचे वाईट फ़ळ संपवण्यासाठी होतो.

तिसरा मार्ग विशिष्ठ ग्रहांचे खडे वापरुन अशुभत्व संपवणे. वास्तवीक ग्रहांचे खडे वापरुन त्या ग्रहांची शक्ती वाढवली जाते. पण तुमच्या पत्रिकेत असलेला अशुभ ग्रह खडे वापरुन शुभ होत नाही. नाहीतर किती सोपा उपाय झाला असता. श्रीमंत व्यक्तींनी तर महागडे व मोठ्या आकाराचे खडे वापरुन सगळेच प्रश्न संपवले असते. पण असे घडत नाही. कारण शुभत्व वाढवण्यासाठी सुध्दा खडे वापरणे याला मिळणारे फ़ळ    सिमीतच मिळते. कसे ते पाहू. एखाद्या व्यक्तीला नोकरीत अधिकार हवा आहे. त्याचा रवि जर त्यादृष्टीने  अनुकूल नसेल तर माणिक म्हणजे रविचा कितीही मोठा खडा वापरुन ते घडणार नाही. याउलट एखादी व्यक्ती अधिकारी आहे पण पुर्ण अधिकार नाही असा त्याचा प्रश्न असेल तर विशिष्ठ सुयोग्य कालावधीतच ( महादशा/अंतर्दशा ) खडा वापरला असता हा पुर्ण अधिकार मिळण्याची शक्यता वाढते.

चवथा मार्ग दान करणे हा सांगीतला आहे. दान देणे सुध्दा खर्चीक असते परंतु त्याने ग्रहाचे संपुर्ण अशुभत्व जात नाही. काही वेळा तात्कालीक ( गोचर ग्रहांचे अशुभत्व ) दुर करण्यासाठी हा उपाय आहे.

मी सहसा फ़ळाची तिव्रता पाहून जातकाला जपाचा सल्ला देतो. हा जप स्वत: करणे आवश्यक असते. अन्यथा दुसर्या कोणाकडुन जप करवुन घेतला असता त्याची फ़ळे मिळतील याची खात्री नसते.

अशुभत्व निवारणासाठी खालील नवग्रह पीडाहर स्त्रोत्रातील विशिष्ठ ग्रहाचा मंत्र स्वतंत्र संकल्पपुर्वक किमान ४००० संख्येने म्हणल्यास अत्यंत प्रभावी उपाय आहे. यासाठी नियम असा की दररोज किमान १०० जप व्हायला हवा. माळ १०८ मण्यांची घ्यावी पण मंत्र मात्र १०० मोजावा. वरचे आठ ही जप संख्या मोजण्यात त्रुटी राहीली असेल असे गृहीत धरुन सोडुन द्यावी. असे किमान चाळीस दिवस १०८ मंत्र म्हणला असता ४००० ही जप संख्या पुर्ण होते. हा जप पुर्ण झाल्यावर परत अजुन ४०० जप हवन, तर्पण किंवा दाना निमीत्त केल्याने ह्या जपाचे पुर्ण फ़ल प्राप्त होते. प्रत्येक वेळी ४००० ही जपसंख्या पर्याप्त असेलच असे नाही. पण याचा उपयोग होतो आहे, त्रास कमी होतो आहे असे जाणवल्यावर हा जप पुन्हा संकल्पयुक्त ४००० करावा. ते कर्मफ़ळ नाश होईपर्यंत हे करत रहावे.

नवग्रह मंत्र " जपाकुसुम संकाश.. ही ग्रहदेवतेची स्तुती आहे त्यामुळे अशुभत्व निवारणासाठी प्रभावी नाही असे माझे गुरु कै. श्री पोक्षेकाका म्हणत. त्यांना अनेक सिध्दी प्राप्त होत्या. त्यांचे मत मी अंतिम मानतो. त्यांच्या मते ग्रहांच्या पुजनासाठी किंवा स्तुतीसाठी नवग्रहांच्या मंत्राचे पठण करावे पण ग्रहाचे अशुभत्व निवारणासाठी मात्र नवग्रह पीडाहर स्तोत्रच जास्त प्रभावी आहे. माझी पीडा हरण कर अशी प्रार्थनाच या मंत्रात आहे त्यामुळे एखाद्या विशिष्ठ ग्रहाच्या अशुभत्वाचे निवारण करण्यासाठी खालील मंत्र प्रभावी आहेत.

ग्रहाणामादिरादित्यो लोकरक्षण कारक:।
विषमस्थान संभूतां पीडां हरतु मे रवि:।।
( आजारी व्यक्तीने हा जप ४००० संख्येने करावा. याने रोग प्रतिकार शक्ती वाढते )

रोहिणीश: सुधामूर्ति: सुधागात्र: सुधशन:।
विषमस्थान संभूतां पीडां हरतु मे विधु:।।

ज्याना मानसीक आजारांनी पिडले आहे व ज्यांना मानसपोचार तज्ञ व त्यांच्या औषधाचे सहाय लागते त्यांच्यासाठी )

भूमिपुत्रो महातेजा जगतां भयकृत्सदा।
वृष्टिकुदृष्टिहर्ता च पीडां हरतु मे कुज:।।

ज्यांना प्रॉपर्टीचे वाद, कोर्ट केसेस किंवा कर्ज झालेले आहे त्यांच्या साठी

उत्पातरूपो जगतां चन्द्रपुत्रो महाद्युति:।
सूर्यप्रियकरो विद्वान्पीडां हरतु में बुध:।।

वाचा/त्वचा रोगाने पिडीतांसाठी उपयुक्त

देवमन्त्री विशालाक्ष: सदा लोकहिते रत:।
अनेक शिष्यसंपूर्ण: पीडां हरतु में गुरु:।।

उच्च शिक्षणात यश मिळावे, संतती संदर्भातले अडथळे दुर व्हावे म्हणुन

दैत्यमन्त्री गुरुस्तेषां प्राणदाश्च महामति:।
प्रभुस्ताराग्रहाणां च पीडां हरतु मे भृगु:।।

विवाह त्वरीत होण्यासाठी किंवा वैवाहीक प्रश्न असताना वरील जप करावा

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय:।
दीर्घचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।।

साडेसाती निवारणार्थ वरील जप करावा तसेच नोकरीतल्या स्थिरतेसाठी म्हणावा.

महाशिरो महावक्त्रो दीर्घदंष्ट्रो महाबल:।
अतनु: ऊध्र्वकेशश्च पीडां हरतु में शिखी।।

राहू महादशेत हा मंत्र प्रभावी आहे.

अनेक रूपवर्णेश्च शतशोऽथ सहश:।
उत्पातरूपो जगतां पीडां हरतु मे तम:।।

विषारी प्राण्यांचे दंश. पोलीस केस यातुन सुटण्यासाठी हा मंत्र प्रभावी आहे.

इति ब्रह्मांड पुराणोक्त नवग्रहपीडा हर स्तोत्र संपुर्ण


निसर्ग आणि संपन्नता    

भारतीय संस्कृतीत पंचमहाभूतांना देव मानले आहे. रखरखीत उन्हाळा संपताना शीतल पावसाची बरसात जशी श्रीमंतांना सुखाऊन जाते तशीच गरीबांना देखील. एका वातानु्कूलीत इमारतीला वातानुकूल ठेवण्याचा खर्च विचारा. हा तासाला हजार रुपयांपासुन सुरु होतो. पण निसर्ग हेच काम करताना तुमच्या कडुन कोणतीच अपेक्षा करत नाही. निसर्ग इतकेच सांगतो की निसर्ग नियमांचे पालन करा.

जसा निसर्गाने हिवाळा आणि उन्हाळा दिलेला आहे त्याही स्थितीत आपल्या शरीराचे तपमान नियमन करण्याचे तंत्र प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात आहे. आपल्याला ही शक्ती जागृत करता आली म्हणजे झाले. मी १९८९ साली जेव्हा नियमीत योगासने करु लागलो तेव्हा माझे साहेब आणि मी बजाज अ‍ॅटोत एकाच पंख्याखाली बसायचो. मी अजिबात पंखा स्वत:हून लावत नाही हा माझ्यातला बदल मला माहित नव्हता जो त्यांना लक्षात आला. मग आश्चर्यचकीत होऊन त्यांनीही बजाज अ‍ॅटोमधील योगवर्गात प्रवेश घेतला.

नेमके काय केल्याने हे साध्य होते हे सांगताना त्यानंतर १६ डिसेंबर २००६ला बजाज मधे बाबा रामदेव आले होते. त्यांना हा एसी चे तपमान फ़ार थंड वाटते आहे का?  असा प्रश्न कॉर्पोरेट बिल्डींगमधला वातानुकूलीत हॉल मध्ये श्रीमान राहूल बजाजसाहेबांनी केला. त्यावर रामदेव बाबा म्हणाले "मैने तो एसी मेरे शरीर के अंदर फ़ीट किया है. बाहर थंड हो तो मैरा सरीर गरम रहता है और बाहर गरमी हो तो मेरा सरीर थंड रहता है. ये सिर्फ़ बाबा ही नही बल्की आपलोग भी कर सकते है. करना ये है बस अनुलोम विलोम प्राणायाम."

आपले घर एसी करण्यासाठी आपल्याला दररोज दहा हजार रुपये कमवायला हवेत. ते कायमचे असायला हवेत तरच हा स्टेटस आपण आयुष्यभर ठेऊ शकू. मग त्यासाठी मानसीक तणाव, मनाला न पटणारे निर्णय घ्यायला हवेत. त्याच बरोबर आरोग्य टिकवण्यासाठी औषधे, महागडा व्यायाम, आहार आणि अनेक काही. इतके करुन मनाचे समाधान नाही. त्या एसी तही झोप येईलच याची खात्री नाही कारण उद्या पण दहा हजार कमवायचे आहेत.

काय करायच ? सगळ सोडुन देऊन संन्यासी व्हायच ? छे अजिबात नाही. आज तुम्ही जेव्हा दररोज दहा हजार कमवता तेव्हा तुमच्या उद्योगामुळे अनेकांना रोजगार मिळतो. तुमची पैशाची आसक्ती संपली तरी जगरहाटी साठी हे सुरु रहायला हव. यातही निसर्गाच्या नियमाचा वापर करुन हे होत असेल तर आणखी छान. कसे ते पाहू.

अनेक हजार वर्षांपुर्वी अश्मयुगात माणुस शिकार करुन उपजिवीका करत होता. आजही डिस्कव्हरीवर दाखवतात की वाघ जेव्हा शिकारीचे दहा प्रयत्न करतो त्यात सरासरी ३ यशस्वी होतात. सरासरी ७ वेळा वाघाचे किंवा सिंहाचे प्रयत्न निष्फ़ळ ठरतात. एक अमेरीकन माणूस अफ़िकेतल्या शिकार करुन रहाणार्यांच्या वस्तीत जाऊन राहीला. त्याला जाणवले की शिकार करायला या टोळीला दिवसभर १५ ते २० किलोमीटर पायपीट करावी लागते. अनेक वेळा शिकार निसटते. अश्मयुगात याचा फ़टका त्या वेळच्या स्त्री वर्गाला बसत असणार कारण आधी पुरुष खाऊन मोकळे होणार आणि उरले तर मग स्त्री वर्गाला मिळणार. मग त्यांनी झाडांच्या बीया जमा करुन त्या कुटुन त्या खाऊन उदरनिर्वाह करायला सुरवात केली. त्या बीया पेरल्या म्हणजे अजुन खात्री होते. यातूनच पुढे शेतीची सुरवात झाली. निसर्ग इथेही भरभरुन देतो. एका दाण्याचे एक कणीस होते. म्हणजे जवळ जवळ १०० पट उत्पन्न देणारा मार्ग कुठला असेल तर तो निसर्गाजवळ आहे.

माणसाला सुखाची साधने लागणार, रस्ते वीज, वहाने आणि अजुनही काही यातुन नियतीचे चक्र पुन्हा उलटे कुणी फ़िरवा असे म्हणले आणि शेतीकडे जा म्हणले तर तो कल्पना विलास ठरेल. हे केवळ अशक्य आहे. एका बाजूला शेती किफ़ायती नाही आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे हे चित्र असताना शेतीकडे जा म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यातुन मी स्वत: शेतकरी नाही.

भारत देश  ऋषि मुनींचा. पुर्वीच्या काळी हे ऋषि मुनी संशोधन करण्यात हयात घालवत. त्यांच्या संशोधनातुन जे अमृत निघे ते अनेक पिढ्या  आत्मसात करत आणि त्याचा उपयोग व्यावहारीक जगासाठी करत. मी जेव्हा प्रथम पदमश्री सुभाष पाळेकरांबाबत ऐकले तेव्हाच मला त्यांच्या बाबत अजुन माहीती घ्यावी असे वाटु लागले. त्यांना २६ जानेवारी २०१६ च्या सुमारास पदमश्री मिळाली पण महाराष्ट्राला अजुन त्यांची ओळखच झालेली नाही.

अजुनही हे नाव माहित झाल नसेल तर ही मुलाखत पहायलाच हवी https://www.youtube.com/watch?v=68CkDaJjtYE

गाय गायीची उपयुक्तता आणि गायीच्या शेणाचे फ़ायदे यावर एक खटला कै राजीव दिक्षीत यांनी जिंकला हे सुध्दा त्याला जोडुन वाचले तर आणखीही माहीती मिळेल.   http://gmjyotish.blogspot.in/2017/03/blog-post_9.html

पदमश्री सुभाष पाळेकर हे तर अधुनीक काळातले ऋषि आहेत असेच म्हणावे लागेल. एक गाय असेल तर ३० एकर शेतीला पुरेल इतक शेणखत त्यांच्या पध्दतीने निर्माण करता येते हा त्यांचा शोध लाखो शेतकर्यांनी मान्य करुन ही पध्दत मान्य झाली आहे. हे तंत्रज्ञान त्यांनी जगासाठी फ़ुकट उपलब्ध करुन दिलेल आहे. ते अनेक ठिकाणी कार्यशाळा घेऊन आणखी माहिती देतात. यासाठी ते स्वत:च्या खर्चाने येतात.
यांना ऋषि नाही म्हणावे तर काय?  निसर्ग आपल्याला कोणताही मोबदला न घेता जसे सर्वकाही देतो तसे त्यांनी जगाला हे तंत्रज्ञान आपली वेबसाईट, पुस्तके आणि सेमीनाराच्या माध्यमातुन कोणताही स्वत:साठी  मोबदला न घेता देतात.

हे दोन लेख जर जोडुन वाचले तर कशाचा व्यवसाय करु हा प्रश्न शिल्लक राहू नये. शेती आणि गोधन असेल तर गोमूत्र व त्यापासुन औषधे, शेणापासुन मिथेन व त्या पासुन वहानांसाठी इंधन, त्या शिवाय गायी दुभत्या असतील तर तो बोनस इतके पर्याय उपलब्ध होत असतील तर शेतकरी काय म्हणुन आत्महत्या करेल? अगदी दुष्काळात सुध्दा तग धरुन राहील.

तरुणांना व्यवसाय करायचा आहे. तरुण त्यासाठी गावाकडुन शहराकडे येत आहेत पण झीरो बजेट शेतीने एक हंगाम काम करु उरलेला वेळ जर ह्या जोड धंदे वाढवण्यासाठी ठेवला तर निसर्गाच्या माध्यमातुन संपन्नता येईल असा माझा विश्वास आहे.

आत्महत्यांच्या आकडेवारीत आणि कारणांमधे न जाता हे कटु सत्य मान्य करावे लागेल की २०१६ सालात सुध्दा आत्महत्या झाल्या. मराठवाड्यात त्या जास्त होत्या. विदर्भात आता हा आकडा घटतोय आणि कोकणात हा आकडा शुन्य आहे. कोकणातली संस्कृती हे त्याचे कारण आहे. मराठवाड्यात उत्तम जमीन आहे. सलग शेतीचे मोठे तुकडे आहेत. गेले काही वर्षे पावसाने हुलकावणी दिली हे मान्य केले कोकणापेक्षा सुपीकता असताना ही आकडे वारी अजुन शेतीची पध्दत बदलायला हवी आणि त्याच बरोबर प्रतिष्ठेच्या कल्पना सुध्दा.

महराष्ट्रातला अधुनिक ऋषि हे सांगत असताना आपण मराठीतुन त्याचा प्रचार केला पाहिजे. हे प्रत्येक शेतकर्याकडे जाऊन सांगीतले पाहिजे. त्यांच्या शहराकडे येऊ पहाणार्या मुलांना समाजाऊन सांगीतले पाहीजे. हा लेख तुम्हीही पुढे पाठवा. तुमच्या मित्रांकडे.

ज्योतिषी म्हणुन मला लोक विचारतात भाग्य कधी उजाडेल. भाग्य निसर्गाच्या नियमाने आणि निसर्गाच्या सहायाने लवकर उघडेल असे मला वाटते. या अधुनिक ऋषिंच्या वर विश्वास ठेऊन जर मार्गक्रमण केले तर मला वाटते नक्कीच उघडेल.


आभारी आहे
हा अंक ज्योतिषप्रेमी लोकांपर्यंत पोचवताना ज्यांनी आपला वेळ दिला आणि बहुमोल सहकार्य केले त्याच्या नावाचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात प्रथम श्री प्रसाद हिरणवार यांना धन्यवाद देतो. यांनी अतिशय सुंदर मुखपृष्ठा्ची संकल्पना केली व कलाविष्कार करुन ते उपलब्ध करुन दिले.

सौ. ज्योती चियेडु , सौ विदुला साठे आणि सौ सीमा सरदेशमुख यांनी प्रसिध्दी पुर्व दुरुस्त्या आणि सुचना करुन अंक निर्दोष कसा करता येईल यासाठी वेळ दिला यासाठी त्यांनाही घन्यवाद.

माझे मित्र अनंतराव कुलकर्णी यांनी एका दिवसात मुखपृष्ठ छपाई, बाइंडिंग करुन या प्रिंट कॉपी प्रकाशनासाठी वेळेत हा अंक दिला यासाठी त्यांचे ही आभार.

जे ज्योतिषप्रेमी एकनाड संशोधनात सहभागी होणार आहेत तसेच जे ज्योतिष तज्ञ यासाठी त्यांच्या संग्रहातुन एकनाड असलेल्या जोडप्यांच्या परवानगीने त्यांच्या पत्रिका तसेच माहीती उपलब्ध करुन देणार आहेत त्या ज्ञात अज्ञात सर्वांचेच सुरवातीलाच आभार.


फ़ेस बुकवर जे ज्योतिष विषयक समुह ( गृप ) या अंकाला प्रसिध्दी देणार आहेत त्या गृपचे प्रमुख यांचे आभार मानतो.

छंद ज्योतिषाचा - श्री देवदत्त जोशी
छत्रपती ज्योतिष समुह - श्री संतोष घोलप
               आपल्या नावाचा उल्लेख चुकून सतिश घोलप असा झाला त्यासाठी दिलगीर आहे.
रेणुका ज्योतिष समुह - श्री सतिश उपाध्ये

या शिवाय जे गृप प्रसिध्दी देतात त्यांचेही आभार. आपला हातभार ज्योतिष प्रचार आणि प्रसार या कार्याला लागतो आहे.




4 comments:

  1. Khoop chan ani upayukt mahiti ahe. asech margdarsahn karave hi prathana.

    ReplyDelete
  2. Very important and useful information

    ReplyDelete
  3. नितीनजी,
    छत्रपती ज्योतिषसमुहाचे प्रशासक संतोष घोलप आहेत.
    संपूर्ण अंक एकाच बैठकीत वाचून काढला उत्तम आहे. एक हाती लेखनाबद्दल अभिनंदन व शुभेच्छा. एकनाडीसंशोधन प्रकल्पालाही शुभेच्छा. मला जमेल तशी मदत मी नक्की करीन. धन्यवाद.

    ReplyDelete
  4. माझी माहिती या पहिल्या लेखात नजरचुकीने काही त्रुटी राहिल्या आहेत. निवेदनाची सुरवात प्रथम पुरूषाने झाली आहे पण पहिल्या परिच्छेदाच्या शेवटच्या वाक्यापासून निवेदन तृतीयपुरुषी झाले आहे. अर्थात ही फार गंभीर गोष्ट नाही पण सर्वांगसुंदर अंकाला पूर्ण निर्दोष करायचे असेल तर असल्या किरकोळ त्रुटीही टाळाव्यात हे बरे.

    ReplyDelete